उल्हासनगर : कल्याणपूर्वे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह ५ जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. गेल्या महिन्यात आमदार गणपत गायकवाड यांनी याच पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने, ते गंभीर जखमी झाले होते.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंगगड कुशीवली गावातील श्यामसुंदर लक्ष्मण पाटील यांची २७ एकर जमीन महसूल विभागाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून नवीमुंबई सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी खरेदी केली होती. त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर, जमिनीचा सात बारा उतारा खान यांच्या नावे झाला असून त्यांनी २०१९ मध्ये अंबरनाथ भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणी करून घेतली. त्यावेळी मलंगगवाडीतील शेवंताबाई मुका फुलोरे आणि इतरांनी त्यास विरोध केला. शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. तर खंडणी मागण्याचा प्रकार ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे.
दरम्यान ऑगस्ट २०२३ मध्ये जमीन मालक असलेले खान यांच्या जमिनीवर ‘ही जमीन महेशशेठ दशरथ गायकवाड आणि इतर आरोपींच्या कब्जे वहिवाटीची आहे. या जमिनीत कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’ असा नामफलक लावला होता. मालकीच्या जमिनीवरील बेकायदा फलक खान यांनी काढण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्याला आरोपींनी विरोध केला. आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अन्यथा आम्हाला पाच कोटी द्या, अशी मागणी आरोपींनी खान यांच्याकडे केली. अशी तक्रार खान यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी केल्यावर महेश गायकवाड यांच्यासह यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.