डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. ६४ जण जखमी झाले. या प्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही कंपनी स्थलांतरीत करण्यात यावी अशी मागणी २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणी संदर्भात संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या शिष्टमंडळाने आज अमूदान कंपनीच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्याचबरोबर मानपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि डोंबिवली एमआयडीसी कार्यालयातील अभियंत्याची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्यासह पदाधिकारी एकनाथ पाटील, गजानन मागरूळकर, भास्कर पाटील, दत्ता वङो, बाळाराम ठाकूर, विजय पाटील, अभिमन्यू म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, बंडू पाटील, वासुदेव पाटील, जालिंदर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष वझे यांनी सांगितले की, डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये आठ वर्षापूर्वी असाच भीषण स्फोट प्रोबेस कंपनीत झाला होता. त्यानंतर आत्ता अमूदान कंपनीत भीषम स्फोट झाला. या पूर्वी याठिकाणी कंपनीला भीषण आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एमआयडीसी परिसराला लागून नागरी वस्ती आहे. त्यात प्रामुख्याने दावडी, गोळवली, सोनारपाडा, सागाव आदी गावेही ही आहेत. या भागातील धोकादायक आणि अतिधोकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्यात याव्यात. त्या जागेत आयटी आणि इंजिनिअरिंगच्या कंपन्या सुरु करण्यात याव्यात. या ठिकाणी आयटी हब सुरु केल्यास तरुणाईला रोजगाराच्या संधी मिळतील.
सरकारकडून यापूर्वीही धोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. संघर्ष समितीची मागणी आहे की, धोकादायक कंपन्या स्थलांतरीत करण्यात याव्यात येत्या पंधरा दिवसात पुन्हा एमआयडीसीच्या अधिकारी वर्गासोबत संघर्ष समिती बैठक घेणार आहे. कामा या कारखानदारी संघटनेशीची संघर्ष समिती चर्चा करणार आहे. कंपन्या स्थलांतरीत केल्या नाही तर समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा वझे यांनी दिला आहे.