लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : कारमधून उतरताना महिलेची बॅग खाली पडली. बॅगेत महागडे दागिने आणि रोकड होती. मानपाडा पोलिसांच्या तपासामुळे महिलेची ही दागिने आणि रोकड परत मिळाली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत बॅगजवळ एक झोमॅटो आणि दुसरा स्विगीचा बॉय दिसतोय. परंतु बॅग कोणी घेतली याचा अंदाज येत नव्हता. बॅग घेऊन जाणाऱ्याचा शोध घेण्यासाठी एका हायप्रोफाईल इमारतीमधील २४ सीसीटीव्ही तपासावे लागले. स्विगीचा डिलिव्हरी बॉय ज्या दुचाकीवर होता. त्या दुचाकीची सीट फाटलेली होती. या फाटलेल्या सीटमुळेच महिलेचे दागिने मिळाले.
डोंबिवली पूर्व परिसरात राहणाऱ्या कविता परब या कुटुंबीयांसोबत काही दिवसांपूर्वी जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. तेथे लक्षात आले की, कारमधून उतरताना त्यांचे दागिने आणि रोकडची बॅग रस्त्यात पडली.
अथक प्रयत्नाअंती ताब्यात घेतलेली दागिन्यांची बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस कर्मचारी मंदार यादव आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी कविता यांना परत केली.
त्वरित परब यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी या प्रकरणाच्या तपासाकरिता पथक नेमले.
२४ इमारती घातल्या पालथ्या- पोलिस कर्मचारी मंदार यादव आणि अन्य पोलिसांनी ज्या ठिकाणी बॅग पडली होती तो भाग सीसीटीव्हीत दिसत नाही. एक झोमॅटोचा आणि दुसरा स्विगीचा बॉय त्याठिकाणी येताना-जाताना दिसत होते. या दोघांपैकी एकाने बॅग घेतली हे निश्चित होते. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला तर स्विगी बॉयने ही बॅग घेतली असल्याचे उघड झाले. त्याला शोधण्यासाठी पोलिस रिजन्सी अनंतम या संकुलातील २४ इमारतींत फिरले.- अखेर २४ व्या इमारतीत हा सुगावा लागला की, स्विगी बॉय कुठे आला होता. स्वप्निल कोलार याने कबुली दिली की, ती बॅग माझ्याकडेच आहे. त्या बॅगेला मी हातही लावलेला नाही. मला माहिती नव्हते ही बॅग कोणाची आहे. ती कुठे जमा करायची असे सांगून त्याने ही बॅग पोलिसांना दिली. कविता परब यांना पोलिसांनी ही बॅग परत केली आहे.