कल्याण: शनिवारी पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये १ हजार २२५ केसेेसमध्ये संबंधित वाहनधारकांकडून आठ लाख १२ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला गेला आहे.
दारू पिऊन वाहन चालवू नका, हेल्मेट वापरा, सीटबेल्ट लावा, वेगमर्यादेचे पालन करा, सिग्नलचे नियम पाळा असे आवाहन वेळोवेळी वाहतूक पोलिसांकडून केले जाते. परंतू नियम पाळले जात नाही. अशा वाहनचालकांविरोधात ई चलानच्या माध्यमातून दंड ठोठावला जातो. जे दंडाची रक्कम भरत नाहीत त्यांच्यासाठी लोकअदालतीचे आयोजन केले जाते.
कल्याण डोंबिवली शहरातील ई चलानसह प्रलंबित दंड असलेल्या वाहनचालक व मालकांना कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी वाहतूक पोलिसांकडून नोटीसा बजावल्या गेल्या होत्या. शहर वाहतूक शाखा ठाणे शहर व विधीसेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विदयमाने शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी उपविभागातील एकूण १ हजार २२५ केसेस निकाली काढण्यात आल्या यात ८ लाख १२ हजार ९०० रूपयांचा दंड भरून घेण्यात आला. यात वाहतूक उपशाखा कल्याण विभागाने दोन लाख ८८ हजार ८०० रूपये, डोंबिवली विभागाने तीन लाख ५ हजार ५०० तर कोळसेवाडी विभागाने दोन लाख १८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला गेल्याची माहिती वाहतूक शाखा कल्याण परिक्षेत्राचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी दिली.