डोंबिवली: ज्वेलर्सच्या दुकानात घुसून एका अनोळखी व्यक्तीने ६५ वर्षीय ज्वेलर्स मालकावर चाकूने हल्ला करीत पलायन केल्याची धककादायक घटना १७ मे रोजी घडली होती. अखेर या हल्लेखोराचा सात महिन्यांनी का होईना शोध लावण्यात रामनगर पोलिसांना यश आले. हल्लेखोर अल्पवयीन असून त्याला हरियाणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
पुर्वेकडील आगरकर रोडवर मन्ना तारकनाथ यांच्या मालकीचे मन्ना नामक ज्वेलर्स आहे. १७ मे ला दुपारच्या सुमारास मन्ना हे आपल्या दुकानात असताना चेहरा झाकलेल्या अवस्थेत एक अनोळखी व्यक्ती दुकानात आली. त्याने मन्ना यांना चाकूचा धाक दाखवला. अचानक झालेल्या या प्रकाराने घाबरलेल्या मन्ना यांनी प्रतिकार केला असता त्याने चाकूने मन्ना यांच्यावर वार केला. हल्ला करून ती व्यक्ती तेथून पसार झाली. दरम्यान हल्लेखोराने हल्ला केल्यावर दुकानातून कोणतीही वस्तू चोरलेली नव्हती त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात होता.
या हल्ल्यात मन्ना जखमी झाले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे यांचे पथक तपास करीत होते. हल्ल्याचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला होता. पण हल्लेखोराने तोंडावर मास्क घातला होता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे आव्हान होते. सीसीटिव्हीच्या आधारे या हल्लेखोराला हरियाणामधून शोधून आणण्यात भराडे यांच्या पथकाला यश आले. हल्लेखोर डोंबिवलीचाच राहणारा आहे.
चोरीचा डाव फसलाचोरीच्या उद्देशानेच हल्लेखोर ज्वेलर्समध्ये आला होता. परंतू मन्ना यांनी विरोध केल्याने त्याचा चोरीचा डाव फसला. त्या रागातून त्याने मन्ना यांच्यावर हल्ला करीत पळ काढला होता. दरम्यान अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.