कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील नारायणवाडी येथे एका बिल्डरने नव्या इमारतीच्या बांधकामाकरीता एक भला मोठा खड्डा खोदला आहे. या खड्ड्यामुळे शेजारी असलेल्या तीन मजली शकुंतला इमारतीला धोका निर्माण झाला आहे. हा बाब कळताच महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. शकुंतला इमारत खाली करण्याची कारवाई केली आहे. त्याठिकाणी भराव टाकण्याचे काम बिल्डरकडूनच करुन घेतले जात आहे. भरपावसात असा प्रकार घडल्याने १९ कुटुंबांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नारायण वाडीत एका बिल्डरकडून नव्या इमारतीच्या बांधकामाकरीता खड्डा खोदला जात आहे. इमारतीच्या पाया तयार करण्यासाठी हा खड्डा खोदला जात असला तरी हा खड्डा शकुंतला इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून आहे. या खड्डयामुळे शकुंतला इमारतीला धोका निर्माण झाला आहे. ही बाब इमारती राहणाऱ््या नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी हालचाल सुरु केली. हा प्रकार महापालिका प्रशासनास कळताच सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमातीत राहणाऱ््या १९ कुटुंबियांना बाहेर काढले. इमारत तूर्तात खाली करण्यात आली आहे. दोन तासाकरीता ही इमारत खाली करुन खाेदलेल्या खड्ड्यात भराव टाकण्याचे काम सुरु केले आहे. तसेच खड्डा खोदणाऱ्या बिल्डरच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.इमारतीत राहणाऱ्या नागरीकांनी मागणी केली आहे की, संबंधित बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे. त्याने खोदलेल्या खड्ड्यामुळे आमच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्याने चुकीच्या पदधतीने खड्डा खोदल्याने आम्हाला आज पावसात घराबाहेर राहण्याची वेळ आली आहे.
हा सगळा प्रकार घडला. मात्र महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बिल्डरला बांधकाम परवानगी दिली गेली आहे. त्या बांधकाम परवानगीच्या आधारे बिल्डर प्रत्यक्ष जागेवर कामाला सुरुवात करतो. नगररचना विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. या विषयी देखील आश्चर्य व्यक्त केले गेले. ज्या बिल्डरने खड्डा खोदला. त्याने देखील समोर येऊन त्याची बाजू काय आहे हे स्पष्ट झालेले नाही.