कल्याण : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने काही तासांतच हरवलेल्या तेरा वर्षाच्या गतिमंद मुलाचा शोध लागल्याने आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास अर्जुन (नाव बदलले आहे) आपल्या आईसोब मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. त्यावेळी, आई तेथील डॉक्टरांसोबत बोलत असताना अर्जुन नकळत तेथून निघाला. अर्जुन गतीमंद असून त्याला जास्त बोलता येत नसल्यामुळे मुलगा हरवल्याचे लक्षात येताच आईच्या काळजाचा ठोका चुकला.
सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मुंबईतील माणसांच्या गर्दीत मुलाला शोधणे अशक्य होते. मुलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. म्हणून त्याच्या पालकांनी एमआरए पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली. सीएसटी येथून अर्जुनने रेल्वे पकडल्याचे सीसीटीव्हीत पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्याचबरोबर राहुल सोनावणे आणि प्रशांत अहिरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती व्हायरल केली.
त्याचरात्री ११.३० च्या सुमारास हा मुलगा पश्चिमेतील आरटीओ कार्यालयाजवळ बसलेला येथील रहिवाशी प्रकाश सावंत यांना दिसला. सावंत यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला काही बोलता येत नसल्याचे त्यांना कळले. पावसात भिजल्याने थंडीने कुडकुडणाऱ्या अर्जुनला त्यांनी कपडे तसेच जेवण दिले. नीट चालता न येणाऱ्या अर्जुनची सावंत यांनी मालिश केली. त्याचदरम्यान १०० नंबरवर संपर्क साधत अर्जुनबाबतची माहिती दिली. थोड्याच कालावधीत खडकपाडा पोलीस ठाण्यातील बीटमार्शल यांनी सावंत यांच्या घरी जावून मुलाबाबत माहिती घेतली.
अर्जुनने परिधान केलेल्या टी-शर्टवर फोर्ट येथील पत्ता असल्याने सावंत यांनी फोर्ट येथे कार्यरत असणारे त्यांचे मित्र पोलीस शिपाई प्रभाकर तळपदे यांना शनिवारी सकाळी संपर्क साधला. सदरचा मुलगा हरवल्याची तक्रार आमच्याच पोलीस ठाण्यात दाखल असून पोलीस उपनिरीक्षक सुरज देवरे यांच्याकडे तपास असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब सावंत यांनी खडकपाडा पोलिसांना सांगितली असता त्यांनी एमआरए पोलिसांशी संपर्क साधला. त्याठिकाणी कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांना समजले. शनिवारी सकाळी त्या मुलाला आई वडीलांच्या ताब्यात दिल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली.