कल्याण: कचरा कुंडीमुक्त शहर त्याचबरोबर शून्य कचरा मोहीम यांसारखे उपक्रम राबवूनही कचरा रस्त्यावर टाकण्याची नागरिकांची सवय अजूनही कायम आहे. अशा कचरा पडण्याच्या ठिकाणी पुर्वेतील सहयोग सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून केडीएमसीने नऊ ठिकाणी ‘शिल्प’ उभारून कचराकुंडी मुक्त उपक्रम चालू केला होता. परंतू वास्तव पाहता स्वच्छतेचा संदेश देणा-या या शिल्पांभोवताली कच-याचा विळखा पडला असून यातील प्लास्टिक कच-याचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांची ही बेजबाबदार वृत्ती शून्य कचरा मोहीमेला हरताळ फासणारी ठरली आहे.
या मोहीमेअंतर्गत कचरा कुंडीमुक्त शहर, ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी गृहसंकुलांमध्ये प्रकल्प उभारणे आदि उपक्रम केडीएमसीकडून राबविले जात आहेत. परंतू आजही बहुतांश ठिकाणी कचरा रस्त्याच्या कडेलाच टाकला जात आहे. यात स्वच्छतेचे संदेश देणारे ‘शिल्प’ ही सुटलेले नाहीत. कच-याचे ढीग जमा होत असल्याने त्या ठिकाणी भटके श्वान आणि गुरांचा संचार वाढला आहे. शहरात व्हायरल तापासह साथीच्या आजाराचे रूग्णही आढळून येत आहेत. परंतू एकुणच परिस्थिती पाहता नागरिकांची कचरा टाकण्याची प्रवृत्ती एकप्रकारे साथीच्या आजारांना आमंत्रण देणारी आहे.
अरूंद रस्त्यांमुळे घंटागाडया पोहोचत नाहीत
कल्याण पूर्वेतील बहुतांश परिसर हा चाळींचा आणि दाटीवाटीने वसलेल्या वसाहतींचा आहे. इथले बहुतेक रस्ते अरूंद आहेत. काही ठिकाणी कच-याच्या मोठया आरसी गाडया सोडाच छोटया घंटागाडयाही पोहोचू शकत नाही. परिणामी कचरा गोळा करण्याच्या प्रक्रियेला मर्यादा येत असल्याने नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकला जातो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
अरूंद रस्त्यांमुळे आणि दाटीवाटीने वसलेल्या वसाहतींमुळे घंटागाडया पोहोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कर्मचारी तेथपर्यंत पोहोचत नसल्याने कच-याचे वर्गीकरण होत नाही. त्यामुळे रस्त्यावर जो कचरा टाकला जातोय त्यात ८० कचरा प्लास्टिकचा असतो. यात शून्य कचरा मोहिमेला हरताळ फासला जात आहे. ज्या ठिकाणी घंटागाडया पोहोचत नाही अशा ठिकाणी काही कर्मचारी नेमून तेथील घरातील कचरा गोळा करण्याची कार्यवाही मनपाने करायला हवी. तेव्हाच कचरा रस्त्यावर टाकण्याच्या वृतीला चाप बसेल. -विजय भोसले, स्वच्छतादूत केडीएमसी