कल्याण : अवैध वाहतुकीच्या संशयातून एक वाहन अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर भरधाव गाडी चढवण्याचा प्रयत्न करत पळून जाणाऱ्या सुरज खैरीराम कायरिया उर्फ बारक्याला दोन वर्षांनी अटक करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे.
सुमारे दोन वर्षापूर्वी पश्चिमेकडील एपीएमसी परिसरात बाजारपेठ पोलिसांची तपासणी सुरू होती. या दरम्यान एका वाहनावर अवैध वाहतूक सुरू असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी ही वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्याचा उद्देशाने वाहन भरधाव वेगाने त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस कर्मचारी प्रसंगावधान राखत बाजूला सरकले. त्यामुळे मोठा अनर्थ ठरला. मात्र, याच दरम्यान चालक तेथून पसार झाला.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत चालकाचा शोध सुरू केला. दोन वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारा सुरज गोविंदवाडी परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांना मिळाली. या माहितीच्या आधारे घोलप यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचत सुरजला अटक केली.