डोंबिवली- डोंबिवलीच्या भोपर गावात दक्षिण आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा म्हणजेच Desert Wheatear पक्षी आढळून आला आहे. पक्षी निरीक्षक आणि आहार तज्ञ डॉ. महेश पाटील यांना या देखण्या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.
नेहमीप्रमाणे डॉ. पाटील हे भोपर गावात फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास हा दुर्मिळ पक्षी दिसला. अतिशय चपळ असणाऱ्या या रणगोजा पक्षाचे दक्षिण आफ्रिकेचे सुप्रसिद्ध सहारा वाळवंट मूळ निवासस्थान. या ठिकाणाहून हा रणगोजा पक्षी तब्बल ५ हजार किलो मीटरचे अंतर कापून डोंबिवलीमध्ये आलाय. विशेष म्हणजे त्याचा आकार आणि रंग हा आपल्याकडील चिमणीप्रमाणेच आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात हा चिमुकला आणि तितकाच कणखर पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून भारतात दाखल होत असल्याची माहिती पक्षी निरीक्षक डॉ. पाटील यांनी दिली आहे. साधारणपणे मार्च अखेरीपर्यंत रणगोजा चा आपल्याकडे मुक्काम असतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा इवलासा पक्षी आपल्या मूळ ठिकाणच्या दिशेने परतताे.