कल्याण-मुंबई आणि नवी मुंबईच्या मधोमध असलेली शहरे ही तिसरी मुंबई आहेत. या या तिसऱ्या मुंबईतील पनवेल, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी आणि नवी मुंबईला जोडणारा रिंग रोड प्रकल्प हाती घेतला जाईल. हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहराच्या धर्तीवर अक्सेस कंट्रोल रिंग रोड तयार केला जाईल. त्याकरीता एमएमआरडीएच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्या नागरीकांना बीएसयूपी योजनेतील घराच्या चाव्याचे वाटप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी अत्रे रंगमंदिरात करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, महापालिका आयुक्त डॉ इंदूराणी जाखड आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कल्याण पूर्वेतील गौरीपाडा येथे उभारलेला सिटी पार्क, कल्याण स्टेशन परिसरातील कै. दिलीप कपोते मल्टी फ्लोअर वाहन तळ, इलेक्ट्रीकल बसे, आधारवाडी अग्नीशमन केंद्र आणि क प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण आणि अमृत दोन प्रकल्पांतर्गत गौरीपाडा येते ९५ दश लक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे आणि नव्या जलकुंभाचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाच्या सुरुवातीला तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड प्रकल्प आवश्यक असून त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यावी अशी मागणी केली. त्यांची हा मागणी मान्य करणाचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,त्याचबरोबर ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ बदलापूर टिटवाळा परिसरात पुण्यातील पीएमपीएलच्या धर्तीवर बस वाहतूक सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचारधीन आहे. हा प्रस्तावही लवकर मार्गी लावला जाईल. त्यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचेच साधन नागरीकांना प्रवासाकरीता उपलब्ध होईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. उल्हासनगर महापालिका हद्दीत कॅशलेस सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु केले आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनेही कॅशलेस सुपर स्पेशालिटी रुग्णालयात करावे, त्यायासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.