कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. प्राप्त अर्जांची उद्या छाननी केली जाणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.
कल्याण लाेकसभा मतदार संघातून कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. महायुतीतर्फे त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उद्धव सेनेचे रमेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. एमआयएमकडून अशफाक सिद्दीकी यांनी अर्ज भरला आहे.
वंचित बहुजन आघाडी तर्फे मोहम्मद शेख सुलेमानीठाकूर यांनी अर्ज दाखल केला आहे. काल वंचित तर्फे जमीन खान यांनी अर्ज दाखल केला होता. या पैकी ज्याने एबी अर्ज जोडला असले त्याची उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत १९ जणांनी अर्ज दाखले केले. त्यामध्ये राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचेअरुण निटूरे, अपनी प्रजाहित पार्टीकडून अरुण जाधव, अमन समाज पार्टीकडून सलीम शेख आणि प्रवीण गवळी बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीचे पूनम बैसाने, बसपाकडून प्रशांत इंगळे, भीमसेनेकडून श्रीधर साळवी, पीस पार्टीकडून हबीबूर खान, राष्ट्रीय मराठा पार्टीकडून हिंदुराव पाटील यांच्यासह ज्ञानेश्वर लोखंडे, अजय मोर्या, नफिस अन्सारी, जमीला शेख, काशीनाथ नारायणकर, अमरीश मोरजकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल अर्ज केला आहे.