डोंबिवली : संत जनाबाईंच्या ओव्यांपासून ते आजच्या काळातल्या कवयित्रींच्या कवितांपर्यंतच्या विविध गाणी रसिकांना जुन्या काळात घेऊन गेली. ऋषिकेश रानडे यांनी तोच चंद्रमा नभात, नको देवराया, शूर आम्ही सरदार, मना घडवी संस्कार, शोधिसी मानवा यासारख्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने रसिक तल्लीन झाले. जागतिक महिला दिनाच्या ओचित्याने मराठीतील महिला कवयित्री, गायिका आणि संगीतकार यांच्या रचनांची सुरेल मैफिल " स्वरगीत यात्रा " या कार्यक्रमात डोंबिवली येथे रंगली. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शैक्षणिक निधीसंकलनाकरीता आयोजित करण्यात येणाऱ्या अमृतोत्सव या सहा कार्यक्रमांच्या शृंखलेतील चौथ्या पुष्पाचे आयोजन शनिवारी सावित्रीबाई रंगमंदिरात करण्यात आले होते.
विठू माझा लेकूरवाळा या गाण्याच्या सादरीकरणाने शरयू दाते हिने कार्यक्रमाची सुरूवात केली आणि ये सखये जवळी घे, निळ्या आभाळी, काय बाई सांगू, परिकथेतील राजकूमारा, बाई बाई मनमोराचा अश्या विविध गाण्यांचे आपल्या गोड आवाजात सादरीकरण केले. तर संपदा माने यांनी खोप्यामध्ये खोपा, माय भवानी तुझी लेकरे, आळविते मी तुला, मयुरा रे, नको नको रे पावसा, कशी या त्यजू पदाला, सजणा कशाशी अबोला या सारख्या उपशास्त्रीय आणि नाट्यसंगितातील विविध गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची सर्व सुत्रे हि महिलांनी सांभाळली. दिपप्रज्वलन म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधा म्हैसकर, लक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी, कार्यक्रमाच्या निवेदिका डॅा समिरा गुजर-जोशी, गायिका संपदा माने, शरयू दाते, व्हॅायलिन वादक श्रुती भावे आणि किबोर्ड वादक दर्शना जोग या सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्या सोनाली गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर मंडळातर्फे सुत्रसंचलन जाई वैशंपायन यांनी केले.
मध्यांतरापुर्वी श्रुती भावे यांनी आपल्या व्हॅायलीनवर काटा रूते कुणाला हे नाट्यगीत सादर केले आणि रसिकांना भावविवश केले. त्यांच्या अप्रतिम आणि प्रतिभाशाली सादरीकरणाने भारावून जाऊन म्हैसकर फाऊंडेशनच्या श्रीमती सुधाताई म्हैसकर यांनी रूपये २१,०००/- रक्कमेचा पुरस्कार जाहीर केला.
अत्यंत आभ्यासपूर्ण आणि सखोल विवेचनातून डॅा समिरा गुजर जोशी यांनी ही महिला गीतकार, संगीतकार आणि कवयित्री यांना मानवंदना देणारी स्वरगीत यात्रा रसिकांना घडवली. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि कार्यक्रमाचे संगीत संयोजन हे सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत संयोजक श्री कमलेश भडकमकर यांनी केले होते. किशोरी आमोणकर यांच्या बोलावा विठ्ठल या शरयू दाते यांनी गायलेल्या अभंगानंतर कार्यक्रमाची सांगता संपदा माने यांच्या अवधा रंग एक झाला या भैरवीने झाली.