डोंबिवली : गाडीत चढल्यानंतर लोकल जलद असल्याचे समजताच घाईत धावत्या लोकलमधून उतरण्याच्या नादात ठाकुर्ली स्थानकातील प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रूळ यांच्यात सापडून युवतीचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३:२०च्या सुमारास दुर्घटना घडली. मेगाब्लॉक असल्याने नेमकी लोकल जलद आहे की धिम्या गतीची, याचा अंदाज न आल्याने युवती गाडीत चढली. मात्र, लोकलमध्ये चढल्यावर ती जलद असल्याचे समजताच तिने घाईत घेतलेला निर्णय तिच्या जिवावर बेतला. याबाबत डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी संगितले की, भाग्यश्री शंकर शिंदे (१७, रा. कृष्ण गोपाळ म्हात्रे चाळ, कुंभारखान पाडा, डोंबिवली पश्चिम) असे मृत मुलीचे नाव आहे. रविवारी ती मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी लोकल प्रवास करताना हा अपघात झाला.
कोपरपर्यंतचे आढळले तिकीट मुलीकडे कोपरपर्यंतचे तिकीट आढळले. रविवारी दुपारी अपघातात ती प्लॅटफॉर्म आणि रुळांत पडल्याने गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. तेव्हापासून लोहमार्ग पोलिस तिच्या वारसांचा शोध घेत होते. मात्र, सोमवारी सकाळपर्यंत त्याबाबत माहिती मिळाली नव्हती.
समाज माध्यमांवर संदेश, आईची पोलिसांत धाव काहींनी अपघाताबाबत समाज माध्यमांवर संदेश व्हायरल करून मोबाइल नंबर दिला होता. अखेर सोमवारी दुपारी वारसांचा तपास लागला आणि त्यानंतर मृत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत ओळख पटवली. जलद लोकल असताना ती ठाकुर्लीत थांबली का? नेमकी मुलगी कोणत्या स्थानकात चढली? याबाबतची माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही. सायंकाळी उशिरापर्यंत अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.