सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : कॅम्प नं. ३ परिसरात शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, गर्भवती मुलीचा सातव्या महिन्यात गर्भपात करण्याकरिता मदत केलेल्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने डॉक्टरला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपीसह चौघांवर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
उल्हासनगर कॅम्प नं. ३ परिसरातील ३२ वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने, ती सात महिन्यांची गर्भवती राहिली. याबाबत कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून आरोपी सागर ढमढेरे याने डॉ. सुशीलकुमार सिंगकडून मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यामुळे मुलीची तब्येत बिघडल्याने आरोपीने पत्नी, मेहुणी व सासूच्या मदतीने मुलीचे वय लपवून मध्यवर्ती रुग्णालयात भरती केले. रुग्णालयात मुलीने सात महिन्यांच्या मृत मुलाला जन्म दिला. आरोपी ढमढेरे याने मृत अर्भक स्मशानभूमीत पुरले. डॉक्टरांना याबाबत संशय आल्याने त्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्याला माहिती दिली. अखेर पोलिस चौकशीत सर्व प्रकार उघड झाला.
चार दिवसांची कोठडी
मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी आरोपी ढमढेरे याच्यासह त्याला मदत करणारी त्याची पत्नी, मेहुणी व सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ढमढेरे याची सासू व मेहुणी यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस अधिकारी आवताडे यांनी दिली. पीडित मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून, पुरलेले अर्भक बाहेर काढून डीएनए चाचणीसाठी पाठविले आहे.