डोंबिवली : लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करीत असताना हेडफोन पडल्याने दोन मित्र कोपर रेल्वे स्थानकात उतरले. पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत हेडफोन शोधत असतानाच त्यांना रेल्वेची धडक बसली. त्यात एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा १७ वर्षीय मित्र जखमी झाला. यासंदर्भात मंगळवारी रात्री डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. कोपर ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात घडला.लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदराजा हैदरअली शेख (१६) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून, सादिक शेख (१७) असे जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. मुंब्रा येथील अहमदराजा, सादिक आणि दोघे असे चार मित्र मलंगगडला जाण्यासाठी कल्याणला गेले होते. तेथून परत येत असताना चौघे मुंब्रा येथे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढले. चौघेही रेल्वेच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होते. लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर अहमदराजाचे हेडफोन रेल्वे रुळावर पडले. हेडफोन घेण्यासाठी अहमदराजा व सादिक कोपर रेल्वे स्थानकात उतरले. त्यांचे अन्य दोन मित्र कोपरला न उतरता पुढे मुंब्रा रेल्वे स्थानकात गेले.
लोकल न दिसल्याने होत्याचे नव्हते झाले अहमदराजा आणि सादिक यांनी कोपर रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे रुळवरून डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालत जाऊन हेडफोन शोधण्याचा प्रयत्न केला. त्या नादात हे दोघे मित्र इतके गुंतले होते की त्यांना समोरून मुंबईच्या दिशेने येणारी अंबरनाथ लोकल दिसली नाही आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. लोकलच्या धडकेत अहमदराजा याचा जागीच मृत्यू झाला, तर सादिकच्या डोक्याला मार लागल्याने त्याला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सादिकने डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या चौकशीत अपघात कुठे आणि दोघे रुळावरून का चालत होते, याची माहिती मिळाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.