कल्याण - कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या या अर्धवट कामामुळेच एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून गाडी दूरवर फेकली फेकली गेली आहे. सुदैवाने, गाडीचा चालक बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. या घटनेमुळे रस्त्याच्या अर्धवट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात असताना पांडुरंगवाडीनजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्राटदाराने एक लोखंडी डिव्हाडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोरोने धडकून रस्त्याच्या गटारीत जाऊन उलटी पडली. या रस्त्यालगत असलेले एका दुकानात कामाला असलेल्या सूरज भारद्वाज यांनी झोपेत असताना अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर धाव घेतली. गाडीत अपघाती अवस्थेत पडलेल्या आकाशला बाहेर काढून त्याला रुग्णालयात पाठविले. ही घटना पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद अद्याप पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही.
या परिसरातील जागरुक नागरीक संतोष भारद्वार यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे. कंत्राटदाराकडून अर्धवट कामाच्या ठिकाणी कोणत्याही सूचना नाही. तसेच रेडीयम पट्टी लावलेली नाही. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे. घटना घडल्यावर त्याठिकाणी कंत्राटदाराने त्याचे कामगार पाठविले. त्यानंतर दिवसभर कामगार अर्धवट कामाच्या ठिकाणी उघड्या असलेल्या लोखंडी गज वाकविण्याचे काम करीत होते. तसेच शेजारी असलेले कल्वर्टचा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बुजविला गेला.
दरम्यान, कल्याण शील रस्त्याच्या कामासंदर्भात उच्च न्यायालयात 2क्क्1क् साली याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे काम चार पदरी करीत असताना रस्त्याचे काम अर्धवट होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आत्ता सहा पदरी काम केले जात असताना पुन्हा रस्ते कामाचा अर्धवटपणाचा पाढा सुरुच आहे. अपघात होत आहे, चार पदरी करताना सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता. आत्ताही समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याप्रकरणी पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी लागेल.