कल्याण: कारचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी हा विरार आणि जळगाव येथील खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कल्याण तालुका पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सोनुसिंग जगदिशसिंग उर्फ सुरजीतसिंग बावरी (वय 24) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न}, वाहनचोरी, घरफोडी, मारहाणीचे गुन्हे ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, पालघर, जळगाव येथील स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
टिटवाळा येथील इंदिरानगरमधून एक कार चोरीला गेल्याची घटना 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयाच्या तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप शिंगटे, पोलीस हवालदार दर्शन सावळे, राहुल बागुल, पोलीस नाईक नंदलाल परदेशी, पोलीस शिपाई योगेश वाघेरे, धनंजय गुजर आदिंचे पथक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आले होते.
गुन्ह्यातील चोरीची कार आणि आरोपीचा शोध घेणेकामी टिटवाळा शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित कार चोरी करण्यासाठी अन्य एका कारमधून तीन ते चार आरोपी आले होते असे निष्पन्न झाले. चोरीच्या गुन्हयासाठी वापरलेल्या कारच्या दिसून आलेल्या नंबरच्या क्रमांकावरून चौकशी केली असता त्या कारच्या मालकाने ती कार पालघर येथील कुंदनसिंग उर्फ कुलदिपसिंग यास विकल्याची माहीती मिळाली. त्या कारचा शोध घेतला असता कुंदनसिंगचा मेहुणा सोनुसिंग बावरी हा ती कार चालवित असून तो टिटवाळा परिसरातील गणेशवाडी येथे राहत असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत तपास पथकाला मिळाली. त्याठिकाणी सापळा लावून सोनुसिंगला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत तो आणि त्याच्या साथीदारांनी इंदिरानगरमधून कार चोरल्याचे तसेच अन्य ठिकाणाहून दोन दुचाकी चोरल्याचे समोर आले. गुन्ह्यात वापरलेली कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून सोनुसिंग हा मूळचा जळगावचा रहिवासी आहे.
त्याने जळगाव मधील एम.आय.डी.सी पोलीस ठाणे आणि पालघर जिल्हयातील विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे दोन खून केले असून त्या दोन्ही गुन्हयात तो फरार होता. दरम्यान कारचोरीच्या गुन्ह्यातील अन्य आरोपींसह चोरी झालेल्या कारचा देखील तपास सुरू असल्याची माहीती तपास पथकातील अधिकारी शिंगटे यांनी दिली.