डोंबिवली:-आपल्या भारताला प्राचीन काळापासूनच ऋषि-मुनींचा वारसा लाभला आहे. श्री जैन श्वेतांबर तेरापंथ समाज 'चरैवेति-चरैवेति' हा मूलमंत्र असलेल्या आपल्या संस्कृतीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. तेरापंथ समाजाचे एकादशम अधिशास्ता, सर्वोच्च आचार्य सुश्री आचार्य महाश्रमणजी महाराज यांनी आजवर जगातल्या तीन देशांतून प्रवास करत 'वसुधैव कुटुंबकम' या आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला आहे.
अशा सुश्री आचार्य महाश्रमणजी महाराज यांचे सध्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नावारूपाला आलेल्या आपल्या डोंबिवली नगरीत आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने रविवारपासून वर्धमान महोत्सवाचे आयोजन करण्यात असून महाश्रमणजींचे प्रवचन ऐकायचे भाग्य लाभल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासूनच कन्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव, बेटी पढाओ या अभियानाने गेल्या ९ वर्षांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. यामुळे भारताच्या सामाजिक मानसिकतेत मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे.
आज 'वंशाचा दिवा' असो किंवा 'वंशाची पणती', दोघांचेही स्वागत तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने केले जात आहे. पूर्वी आपल्या समाजात एकत्र कुटुंबपद्धती होती. या कुटुंबपद्धतीचे फायदे म्हणजे आपण सतत आपल्या जवळच्या माणसांसोबत असायचो. आज एकत्र कुटुंब कमी होत आहेत. आपल्या सर्वांच्याच हातात मोबाइल आले आहेत, पण आपण एकमेकांपासून दूर गेलो आहोत. मोबाइलमुळे संपर्क होऊ शकतो, पण संवादाचे प्रमाण मात्र कमी होत आहे. लहान मुलांच्या हातात असलेल्या मोबाइलमध्ये मुलं हरवून गेल्याचं आपण अनेकदा पाहतो. याची काळजी वाटते. त्यामुळे आपण सर्वांनीच डिजिटल डिटॉक्सीकेशन करण्याची गरज असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच ज्या तरूणांकडे आपल्या देशाचं भविष्याचे शिल्पकार म्हणून बघतो, ती तरुणाई व्यसनांच्या विळख्यात गुंतत आहे.
याने तरुणांच्या आरोग्यावर तर दुष्परिणाम होणार आहेच, पण देशाच्या भविष्यावर देखील दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे व्यसनमुक्त समाजाचा संकल्प आपण साऱ्यांनीच केला पाहिजे. अशा अनेक विषयांवर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.