डोंबिवली - महावितरणच्या वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई व विरार विभागात अधिक वीजहानी असणाऱ्या भागात वीज चोरांविरुद्ध महावितरणने कारवाई अधिक तीव्र केली आहे. विरारच्या गोपचरपाडा येथे दोन इमारतीत ४८ तर वालिव शाखेंतर्गत ५३ तर नालासोपारा पूर्वमध्ये दोन जणांकडे सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणण्यात आली असून या सर्वांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार विरार, नालासोपारा आणि तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वसई-विरार विभागात संतोष भुवन, गावराई पाडा, वालईपाडा, मोरेगाव, नागिनदास पाडा, चंदनसार, मनवेलपाडा, कारगिलनगर, भोयदापाडा, नवजीवन, सातीवली, वालीव, जुचंद्र, टाकीपाडा, धानीवबाग, पेल्हार, शांतीनगर, गांगडेपाडा, नालासोपारा पूर्व आदी भागात वीजहानी अधिक आहे. गोपचरपाडा येथे दोन इमारतीत ४८ जणांनी गेल्या ९ महिन्यात ४ लाख १५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे कारवाईत उघड झाले असून सहायक अभियंता अमेय रेडकर यांच्या फिर्यादीवरून सर्व ४८ जणांविरुद्ध विरार पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
वालिव शाखेंतर्गत केलेल्या धडक कारवाईत ५३ जणांकडील ९ लाख ६० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून सहायक अभियंता सचिन येरगुडे यांच्या फिर्यादीवरून या सर्वच ५३ जणांविरुद्ध नालासोपारा पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नालासोपारा पूर्वेत काकडे परिसरात दोन जणांनी ६ लाख ३९ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. सहायक अभियंता विनय सिंह यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून व वीज मीटर टाळून परस्पर वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.
वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा व सुलभ पद्धतीने उपलब्ध असलेली अधिकृत वीजजोडणी घेऊन वीजवापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.