कल्याण: कल्याण आणि डोंबिवलीच्या खाडी परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात कल्याण तहसील कार्यालयाने धडक कारवाई केली आहे. रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पथकाने बोटीने पाठलाग करत, ही कारवाई केली. पाठलागाचा हा थरार सुरू झाल्यानंतर रेती उपसा करणाऱ्यांनी सुरुवातीला प्रतिकार केला. मात्र कारवाई पथक जुमानत नसल्याचे पाहून रेती उपसा करणाऱ्या कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या टाकून पळ काढला आहे. तर रेती उपश्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कल्याणमधील दुर्गाडी रेतीबंदर परिसरात ही कारवाई करण्यात आली. डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या दोन ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी अवैध रेती उपसा सुरू होता. या दोन्ही ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास रेती रातोरात हलविली जात होती. रेती उपसा करणारे ड्रेजर्स, बाज, बोटी या खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. यामुळे त्या कळून येत नव्हत्या. याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली.
थेट खाडीत बोटीने पाहणी करत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला. तहसीलदारांच्या कारवाई पथकाने रेती उपसा करणाऱ्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. पथक उपसा करणाऱ्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या घेत पळ काढला. कारवाई पथकाने सात रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड या पथकाने नष्ट केले आहेत. कारवाई दरम्यान जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली आहे. यापूढेही कारवाईत सातत्य राहणार असून गस्त ठेवली जाणार आहे. खाडी परिसरात रेती उपसा करण्याचे कंत्रट रॉयल्टी देऊन काही वैध रेती उपसाधारकाना देण्यात आले आहे. त्यांच्याकडून सरकारला रॉयल्टी मिळते. मात्र अवैध रेती उपसा करणारे सरकारला कोणताही महसूल न देता रेती उपसा करून खाडी पर्यावरणास धोका निर्माण करीत आहे. अवैध रेती उपश्यामुळे मुंब्रा दिवा, कोपर आणि डोंबिवली दरम्यान रेल्वे मार्गास धोका निर्माण झाला आहे.