लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान या रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी दोषी अधिकारी वर्गाच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी दिले. अमुदान कंपनीच्या ठिकाणी खाडे यांनी सोमवारी भेट दिली. ते म्हणाले की, कंपनीतील रिॲक्टर कसा आणि का फुटला याची चौकशी केली जाणार आहे. जे कामगार स्फोटात मृत्युमुखी पडले त्यांचे वय आणि त्यांची कंपनीतील राहिलेली सेवा वर्षे याची माहिती घेऊन कंपनी मालकाकडून त्यांना त्यांचे लाभ देण्यासाठी कामगार आयुक्त विभागाला आदेश देणार आहे.
निर्णय मालकांच्या सोयीनुसार
अपघातग्रस्त अमुदान कंपनीचे सेफ्टी ऑडिट केले होते का, असे विचारले असता खाडे म्हणाले की, सेफ्टी ऑडिट झाले होते, असे मला सांगण्यात आले. मात्र झाले होते की नाही तेही तपासले जाईल. डोंबिवलीतील १५६ धोकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय मविआ सरकारच्या काळात घेतला होता. त्याचे पुढे काय झाले, याची विचारणा केली असता खाडे म्हणाले की, धाेकादायक कंपन्या अन्यत्र हलविण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. मात्र, कंपन्या अन्यत्र हलविणे कंपनी मालकांना सोयीस्कर आहे की नाही हे जाणून घेतले जाणार आहे.