कल्याण- कल्याण डोंबिवलीत ६५ बिल्डरांनी महापालिकेची परवानगी मिळविल्याचे भासवून रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाण मिळविले. बेकायदा इमारती उभ्या केल्या. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. याशिवाय या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरु आहे. यातील बिल्डरांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या बेकायदा इमारती शोधून महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. दोषी अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.
बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी राज्य सरकारने रेरा कायदा आणला. महापालिका हद्दीतील ६५ बिल्डरांनी खोट्या सही-शिक्क्यांचा वापर करून महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून रेरा कडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले.अनधिकृत इमारती उभारती उभारल्या. या बेकायदा इमारतीतील घरे नागरीकाना विकून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याविषयी अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी सांगितले की, सर्वे करत इमारती कुठे आहे ते शोधून काढले. त्यानंतर इमारतींवर कायदेशीर कारवाई करत अनधिकृत बांधकामे घोषित केली .
६५ पैकी ५७ इमारतींवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित बेकायदा इमारती एमएमआरडीए आणि एमआयडीसी नियोजन प्राधिकरण असलेल्या हद्दीतील आहेत. त्यांना देखील कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. ६५ बिल्डरांकडून २०१५ ते २०२२ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे. यात कोणते अधिकारी दोषी आहे. त्यांनी कारवाईची प्रक्रिया का केली नाही. हे तपासून दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल.