डोंबिवली : आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आमदार आदित्य ठाकरे हे उमेदवार असतील अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डोंबिवलीत दौरा होता, त्यावेळी त्यांनी लोकमतला ही माहिती दिली.
ठाकरे यांनी पश्चिमेला तसेच पूर्वेला पक्षाच्या कार्यलयांना भेट दिली, रोड शो केला, त्यावेळी इंदिरा गांधी चौक ते मानपाडा रस्ता एक दिशा मार्ग अडवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार निश्चितच दिला जाईल, गद्दारांना उत्तर मिळेलच, प्रचंड विरोध आहेच तो मतात उतरेल असा टोला ठाकरे यांनी हाणला. त्या लोकसभेसाठी ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई हे उमेदवार म्हणून पुढे येणार का?, तर त्यावरही विचारे यांनी नाही सांगत तगडा उमेदवार येणार असे स्पष्ट केले. ठाकरेंनी मानपाडा रस्त्यावरील फुटपाथवर सभा घेत नागरिकांना आवाहन केले, त्यावेळी गद्दारांना गाडा अशी घोषणा देण्यात आली.
शिवसेनेची मूळ मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने लाटली असून त्याबद्दल देखील ठाकरे म्हणाले की, हरकत नाही, ज्यांनी शाखा घेतली, शाखा तोडली त्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी सज्ज व्हा. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, युवा नेते वरूण सरदेसाई, खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, सदानंद थरवळ, विवेक खामकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या शिंदे गटाकडे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार घालायला ठाकरे आले नाहीत, ते घाबरले की काय असा टोला त्या मध्यवर्ती शाखे बाहेर उभे असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, शहरप्रमुख राजेश मोरे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आदित्य ठाकरे उमेदवार म्हणून येत असतील तर त्यांना वेलकम आहे अशा शब्दात शिंदे गटाने त्यांचे स्वागत केले.