अनिकेत घमंडी, डोंबिवली: नवी पिढी बेजबाबदार असल्याचे बरेच वेळा जुन्या पिढीकडून ऐकवले जात असल्याचे दिसते. त्यांनी बहुतेकवेळा नावे ठेवली जातात; पण आपण त्यांच्यावर उत्तम संस्कार केले तर निश्चित घडणारी पिढी ही उत्तमच घडेल या विश्वासाने लोकमान्य गुरुकुल कार्यरत आहे आणि म्हणूनच आज या शाळेतील विद्यार्थिंनींनी एक स्तुत्य उपक्रम पार पाडला. पोलीस, अग्निशामक दलातील कर्मचारी, पोस्ट ऑफिस मधील पोस्टमन, पेट्रोल पंप कर्मचारी, रिक्षा चालक, वाहतूक पोलिस आणि हाँस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले.
पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस , अग्निशमन दल, पेट्रोल पंप, रिक्षा स्टँड, वाहतूक पोलिस कक्ष आणि हॉस्पिटलचे डॉक्टर्स हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. यांच्यामुळे समाज सुरळीत चालण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण मदत होत असते.ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो हे सामाजिक भान विद्यार्थ्यांमध्ये यावे यासाठी लोकमान्य गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी बुधवारी समाजातील या अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तींना राखी बांधून सामाजिक सलोख्याचा एक संदेश दिला.
विद्यार्थी याठिकाणी राखीबांधण्यासाठी गेले होते:-
रामनगर वाहतूक नियंत्रण कक्ष (पोलीस स्टेशन), टिळक नगर पोलीस स्टेशन, पेंढारकर महाविद्यालयाजवळील पोस्ट ऑफिस, अग्निशमन दल, पेट्रोल पंप वरील कर्मचारी, रिक्षा स्टँड वरील रिक्षा चालक, ऑर्थोवेद आणि गोखले हॉस्पिटल मधील डॉक्टर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांनी येथील काम करणारे पोलीस, डॉक्टर, महिला कर्मचारी सुद्धा व इतर सहकारी- कर्मचारी अशा सर्वांना रीतसर ओवाळून राखी बांधून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. या प्रसंगी लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे, पर्यवेक्षक शांताराम बोरसे, उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई शाळेतील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी विद्यार्थ्यांबरोबर गट करून या ठिकाणी गेले होते.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने उत्साहात पार पाडला .-अर्चना पावडे, मुख्याध्यापिका