मुरलीधर भवार
कल्याण-गणपती आगमनापूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजवा असे आदेश आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र कंत्राटदाराकडून काम केले जात नसल्याने काल स्वत: आयुक्तांनी रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याची पाहणी केली. तसेच खड्डे बुजविले नाही तर कंत्राटदाराना काळ्य़ा यादीत टाकण्याची तंबी दिली. त्या पश्चात आजपासून शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली आणि कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे. कल्याण मधील ब प्रभागातील टावरी पाडा, रामबाग लेन नंबर चार, बारावे रोड, भोईरवाडी, जे प्रभागातील लोकग्राम, नव्वद फुटी रोड, क प्रभागातील दुर्गाडी गोविंदवाडी बायपास रस्ता ,नानासाहेब धर्माधिकारी रोड या रस्त्यावरील खड्डे भरणो व डांबरीकरणाची कामे करण्यात आली तर डोंबिवलीमध्ये गरीबाचा वाडा रोड ,जोंधळे हायस्कूल रोड , मंजूनाथ शाळेसमोरील रस्ता, जैन मंदिर रोड दत्तनगर, नांदिवली रोड , नेरूरकर रोड, टिळक रोड, टिळक चौक , लोढा कासाबेला गणेश घाट रोड, रेतीबंदर रोड ,वरील खड्डे डांबरीकरणाने भरण्यात आले . ई प्रभाग व आय प्रभाग येथे खडीकरणाने रस्ते दूरूस्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या इतर परिसरातही खड्डे भरणे आणि डांबरीकरणाचे काम यापुढेही सातत्याने चालू राहणार आहे अशी माहिती शहर अभियंता कोळी देवनपल्ली यांनी दिली.
दरम्यान यासंदर्भात माजी शिवसेना नगरसेवकांसोबत आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत सदस्यांनी खडडे तातडीने बुजविण्याची मागणी केली होती. कामाला सुरुवात नसून खड्डे भरले जात नसल्याच्या मुद्याकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात नाही केली तर आयुक्तांच्या दालनासमोर चिखल फेको आंदोलन केले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला होता.