डोंबिवली-डोंबिवली पश्चिम भागातील स्टेशन परिसरात फेरीवाले बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. फेरीवाला पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेकडून ठाेस कारवाई केली जात नाही. ही बाब भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्याची मागणी धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे.
स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास नगरसेविका म्हणून सारखा मज्जाव करते. मात्र महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत महापालिका आयुक्त हे प्रमुख आहेत. प्रशासकीय राजवटीत स्टेशन परिसरात बसणाऱ््या फेरीवाल्यांचे फावले असल्याचा आरोप धात्रक यांनी केला आहे. फेरीवाला हटाव पथकाकडे यापूर्वी २५ कामगार होते. आत्ता पथकाच्या ताफ्यात केवळ सहा कामगार आहेत. त्यामुळे अपुऱ््या मनुष्यबळाच्या आधारे फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. स्टेशन पररिसरात १५० मीटरच्या अंतरात फेरीवाला बसला नाही पाहिजे असे न्यायालयाचे आदेश आहे. महापालिका कारवाई करीत नसल्याने महापालिकेकडून एक प्रकारे न्यायालयाच्या आदेशाचेच उल्लंघन केले जात असल्याच्या मुद्याकडे धात्रक यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान महिन्याभरापूर्वी मनसेकडून स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठविण्यात आला होता. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी फेरीवाला हटविण्यासाठी प्रशासनाला अल्टीमेट दिला होता. त्या आधीच फेरीवाले गायब झाले. महापालिकेने कारवाई केली. आत्ता पुन्हा फेरीवाले स्टेशन परिसरात बसू लागल्याने मनसे पाठोपाठ आत्ता भाजपच्या नगरसेविका धात्रक यांनीही या प्रकरणी आवाज उठविल्याने महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई होणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.