कल्याण: केडीएमटीच्या गणेश घाट आगारातील कार्यशाळेतील रॅम्पवर उभ्या असलेल्या दोन बस शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. आग शॉर्टसर्किटने लागली की अन्य कारणामुळे याचे गूढ कायम असताना, या घटनेची स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांच्या मार्फत सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती केडीएमटीचे महाव्यवस्थापक दीपक सावंत यांनी दिली.
आगीच्या घटनेपूर्वी रात्री ८.३० ला एका एसी बससह दोन साध्या बसच्या काचा दगड मारून फोडल्याचा प्रकार घडला. त्यानंतर रात्री ११.३० च्या सुमारास रॅम्पवरील दोन बस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. काही तासांच्या फरकाने एकामागोमाग हे दोन प्रकार घडले. ज्याठिकाणी आग लागली त्याबाजुकडील सीसीटिव्ही कॅमेरे देखील बंद आहेत. त्यामुळे या एकुणच प्रकारामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत असताना केडीएमटीचे महाव्यवस्थापक सावंत यांनी प्राथमिक चौकशी झाली आहे परंतू सखोल चौकशी साठी एका स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला जाणार आहे अशी माहीती लोकमतशी बोलताना दिली.