डोंबिवली - वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातच्या दावणीला बांधलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती सरकारचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील युवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बुधवारी निषेध आंदोलन केले. त्यावेळी गुजरातला उद्योगाचा पेटारा, महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा, गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी, गद्दारांना ५० खोके महाराष्ट्राला धोके, अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना गुजरातला गेलेला प्रकल्प महाराष्ट्रातच स्थापन होण्याबाबतचे निवेदन दिले. राज्यातील तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटणाऱ्या महाराष्ट्र विरोधी उद्योग चालविणाऱ्या शिंदे, फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे गट व भाजपचा निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादीच्या आंदोलनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळल्याचे पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले. त्यावेळी भिवंडी जिल्हाध्यक्ष आसिफ खान, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रम खामकर, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष नरेश साळवे, भिवंडी तालुका अध्यक्ष कुंडलिक पाटील, अंबरनाथ तालुका अध्यक्ष विजय काठवले, कल्याण तालुका अध्यक्ष अमोल जाधव, शहापूर तालुका अध्यक्ष निलेश पाटोळे, अंबरनाथ शहर अध्यक्ष प्रमोद बोऱ्हाडे यांसह युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.