कल्याण - लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. जोर्पयत प्रदूषण रोखले जात नाही. तोर्पयत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा निकम यांनी दिला आहे.नदी पात्र मोहने येथे निकम यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांना माजी नगरसेवक उमेश बोरगावकर आणि कैलास शिंदे यांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर उल्हास नदी बचाव कृती समितीचे रविंद्र लिंगायत, वालधूनी जलबिरादरीचे शशिकांत दायमा यांनीही पाठिंबा दिला आहे. निकम यांनी सांगितले की, राजमाचीच्या डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कजर्तपासून प्रदूषित होते. मात्र मोहने बंधारा येथे ती जास्त प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात म्हारळ, गाळेगाव आणि म्हारळ येथील सांडपाण्याचे नाले येऊन मिळतात. या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात जलपर्णी उगविली आहे. दरवर्षी नदी पात्राच्या पाण्यात जलपर्णी उगविते. जलपर्णी मोठय़ा प्रमाणात पाणी शोषते. जलपर्णी काढण्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, लघू पाटबंधारे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही एक ठोस पावले उचलली जात नाहीत. नदीमधील जैव विविधता प्रदूषणामुळे धोक्यात आली आहे. या नदीच्या पाण्यावर ४८ लाख लोकांची तहान भागते. २०१५ सालापासून निकम हे उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत आहेत. २०१६ मध्ये त्यांनी १२ दिवस नदी पात्रात बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. त्यानंतर पुन्हा ७ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. आत्ता जोर्पयत ठोस उपाययोजना केली जात नाही तोर्पयत आजपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे निकम यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने आंदोलनाच्या ठिकाणी बॅनर लावला आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मोहने मोहने नाला येथे बंधारा आणि उदंचन केंद्र बांधून सांडपाणी आंबिवली मलशुद्धीकरण केंद्रात नेण्याचे काम सुरु आहे.