डोंबिवली - मानपाडा परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या, कब्जे वहीवाटीच्या व गावकीच्या गुरचरण गोवण रस्ते पायवाटा व सरकारी मिळकतीवर विकासकांनी गैरमार्गाने,बेकायदेशीररित्या निर्माण केलेली अवैध वस्ती हटविण्याबाबत व शेतकर्यांना, गावक-यांना व कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आगरी युवक संघटनेच्या माध्यमातून गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या परिसरातील विकासकांनी गैरमार्गाने, बेकायदेशीररित्या सर्व नियमांचे उलघन करून अवैध वस्ती निर्माण केलेले असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
सदर मिळकती या मानपाडा, सोनारपाडा,सागाव,भोपर,संदप, उसरघर,घारिवली,काटई,कोळे, बेतवडे या गावातील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या व कब्जे वहीवाटीच्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तेथील खासगी कंपनी प्रशासन आणि विकासकांनी भंग करून सदर मिळकती वरील गैरमार्गाने निर्माण केलेली सर्व अनाधिकृत बांधकामे व बेकादेशीर निर्माण केलेली कामगार वस्ती हटवून,तसेच शेतजमीनी वरील झालेले सर्व फेरफार, सात बारा उतारे,खरेदीखत व विक्रिखत रद्द करून,त्या जमिनी मुळ मालक असलेल्या शेतक-यांच्या व गुरचरण,गोवण, रस्ते आणि पायवाटा गावकऱ्यांच्या नावे करून,परत ताब्यात देण्यात याव्यात. कामगारांची थकबाकी असलेली येणे रक्कम त्यांना २१ व्याजदराने त्वरित देण्यात यावी.
विकासकांनी गैरमार्गाने नैसर्गिक नाले गाडून गटाराचे सांडपाणी शेतात सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाची होणारी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी. तसेच बेकादेशीर कामगार वस्तीचे सांडपाणी सोडण्यासाठी रस्त्याच्या खालून टाकलेली भुमिगत गटार नालाचे पाईप रस्ता खोदून त्वरित काढून टाकण्यात यावी आणि घारीवली गावाच्या मुख्य रस्त्याच्या दिशेला व शेतीत सोडण्यात आलेले सांडपाणी व गटार नाल्याचे सुरू असलेले कामकाज त्वरित थांबवावे आदी मागण्या त्यावेळी करण्यात आल्या. त्याबाबत शासनाने १५ दिवसांत कारवाई न केल्यास शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र आणि कामगार वरील अन्याया विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आयुस प्रमुख गोविंद भगत यांनी जाहीर केले. त्या आंदोलनात सुरेश संते, सुनील पाटील, गुरुनाथ पाटील, मनोज पाटील आदींसह अन्य सहभागी झाले होते.