डोंबिवली: ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जागरूकता महिना मानला जातो त्यानिमित्ताने एम्स हॉस्पिटलने पिंक रन ५ किमी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. त्यामध्ये शेकडो।महिलांनी सहभाग घेऊन त्या विषयावरील उपचाराची जनजागृती केली. तो कार्यक्रम ऑलिम्पिक स्पोर्ट्स क्लब, लेकशोर, फेज २, पलावा येथे संपन्न झाला. त्या मॅरेथॉनला पाचशेहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आणि त्या स्पर्धकांनी स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीच्या सामाजिक जाणीवेला पाठिंबा दर्शवला. स्तन कर्करोगातून यशस्वी उपचार घेऊन कॅन्सर मुक्त झालेल्या अनेक महिलांनी या मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवला.
कॅन्सर सर्व्हायव्हर्स (कर्करोग लढवय्ये) असे संबोधून त्यांच्या धैर्याबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल हॉस्पिटल तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. काही महिलांनी आपल्या यशस्वी लढ्याचा अनुभव सर्वांसमोर सादर केला. या लढ्या मध्ये एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी व स्टाफ ने दिलेल्या सहकार्याबददल टीम चे आभार मानले. आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पत्नी योगिता पाटील यांनी मॅरेथॉनमध्ये उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. एकाच छताखाली संपूर्ण कर्करोगाचे उपचार मिळतील हा दृष्टिकोन ठेवून डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी डोंबिवलीत २००६ मध्ये अत्याधुनिक कर्करोग सेंटर सुरू केलें व तेव्हा पासून मागील १७ वर्षांमध्ये हजारो कर्करोग रुग्णांचे उपचार केले आहेत. एम्स कॅन्सर केअर सेंटर मध्ये (कर्करोग उपचार विभागात)-कर्करोग शस्त्रक्रिया, लिनियर ऍक्सेलरेटर रेडिओथेरपी, ब्रॅकीथेरपी, 3डी टोमोमॅमोग्राफी, हिमॅटो-ऑन्कॉलॉजी, फ्रोझन सेक्शन आणि केमो थेरपी दरम्यान केस गळण्याची प्रक्रिया कमी करण्यासाठी स्काल्प कूलिंग तंत्रज्ञानासह समर्पित केमोथेरपी विभाग कार्यरत आहे. एम्स मधील थ्रीडी टोमोमॅमोग्राफी मशीन हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे अतिशय लहान गाठ देखील लवकर निदान करून देते, जी सामान्यतः नियमित मॅमोग्राफीमध्ये दिसत नाही. याचे रेडिएशन डोस खूपच कमी असतात आणि याद्वारे अधिक अचूक प्रतिमा (इमेज) प्रदान केली जाते. एम्स हॉस्पिटल्सच्या कर्करोग तज्ञांच्या टीमने सर्व सहभागींमधील 40 पेक्षा जास्त वयोगटातील महिलांसाठी नियमित मॅमोग्राफी आणि स्तन तपासणी करण्याचे आवाहन डॉ. शिरोडकर यांनी केले. मॅरेथॉन नंतर स्पर्धकांसाठी झुंबा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.