अजित पवार डोंबिवलीत येणार; महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनची चिंतन बैठक!
By अनिकेत घमंडी | Published: January 23, 2023 06:14 PM2023-01-23T18:14:52+5:302023-01-23T18:15:27+5:30
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे यश मिळाले आहे.
डोंबिवली: राज्याचे क्रीडा क्षेत्रातील गौरवस्थान कसे टिकवून ठेवता येईल. खेळाडूना कोणत्या सुविधाची गरज आहे. भविष्यातील ऑलम्पिक उड्डाणासाठी क्रीडाक्षेत्राची रणनीती कशी असेल. महाराष्ट्र राज्याचा खेळाडू देशाचे नेतृत्व कसे करू शकेल? या विषयावर डोंबिवलीत गुरुवारी जिमखाना येथे चिंतन मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी सोमवारी दिली. त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
त्या चर्चासत्रात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून सविस्तर आराखडा शासनाकडे सादर केला जाणार आहे. प्रत्येक खेळाडूचे लक्ष्य ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळवणे हे असले तरी क्षमता असतानाही अनेक खेळाडूना उद्भवणाऱ्या अडचणीमुळे त्यांना उद्दिष्ट गाठता येत नाही. या खेळाचा व खेळाडूचा विकास करण्याचा निश्चय असोसिएशनचे पवार यांच्या नेतृत्वाखाली केला आहे. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे यश मिळविले आहे.
राज्याला क्रीडा क्षेत्रात मिळालेला हा सर्वोच्च बहुमान असून हा बहुमान टिकविण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्या चिंतन बैठकीत क्रीडा क्षेत्राला महत्वपूर्ण दिशा देणारी ही बैठक प्रथमच सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत होत आहे. या बैठकीत अर्जुन पुरस्कार विजेते अशोक पंडित,ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार पटकावणारे अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. राज्यभरातील क्रीडा संघटनाच्या सदस्याबरोबर बैठक तसेच चर्चासत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेने यापूर्वीच खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाकांक्षी निर्णय घेताना प्रत्येक खेळाडूना स्पर्धेच्या ठिकाणा पर्यत हवाई जहाजाने पोहोचविणे, खेळाडूना खेळाचे साहित्य, शूज याबरोबरच दिवसातून तीन वेळा पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर खेळाडूना दिल्या जाणार्या बक्षिसाच्या रक्कमेत देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. खेळाडूना स्पर्धाची सवय लागावी यासाठी दर दोन वर्षांनी ऑलम्पिक दर्जाच्या स्पर्धा राज्य शासनाकडून आयोजित केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र ओलम्पिक असोसिएशनने राज्य पातळीवर आपल्या मराठी मातीतील मल्लखांब, योगा, सॉफ्टबॉल, गोल्फ, सॉफ्टटेनिस, स्केटिंग यासारख्या ७ खेळांना नव्याने स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात खेळाच्या अनेक संघटना असून या संघटना खेळाडू घडवत असल्या तरी त्यांना अनेक समस्या असतात. या समस्या जाणून घेत त्यासोडवून या खेळाडूंना ओलम्पिकपर्यंत पोचविण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
डोंबिवली जिमखाना आणि महाराष्ट्र ओलम्पिक असोसीएशनचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्रओ लम्पिक असोससीएशनचे कार्यकारी सदस्य आणि आयोजन समिती अध्यक्ष दीपक मेजारी यांनी सांगितले. ही त्यावेळी टेबलटेनिसचे सेक्रेटरी यतीन टिपणीस, जिमखान्याचे सेक्रेटरी धनंजय कुडाळकर, पर्णाद मोकाशी, क्रीडा शिक्षक उदय नाईक, लक्ष्मण इंगळे, प्राचार्य घनश्याम ढोकरट, समन्वयक अविनाश ओंबासे आदी उपस्थित होते.