डोंबिवली - डोंबिवली निवासी भागातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या उद्यानात दारु पार्ट्या करणाऱ्यांनी हैदोस घातला आहे. ही बाब आज दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रकर्षाने समोर आली आहे. दारु पार्ट्या करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील जागरुक नागरीकांकडून केली जात आहे.
डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. काही दिवसापूर्वीच डोंबिवली स्टेशन परिसरातील फूटपाथवर काही लोक खुलेआम दारुचे सेवन करीत असल्याच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आत्ता दिघे उद्यानातील दारु पार्ट्यांची बाब समोर आली आहे. उद्यानात दारु आणि बिअरचा खच पडलेला आहे. उद्यानात झुडपे वाढली आहेत. खेळणी तुटलेली आहेत. हे उद्यान माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी २००२ साली नगरसेवक निधीतून विकसीत केले होते.
२०१७ साली खासदारांच्या निधीतून सुशोभित करण्यात आले. उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे केडीएमसीचे दुर्लक्ष होत आहे. उद्यानात सुरक्षा रक्षक आहे. त्याच्यासाठी केबिन आहे. मात्र सुरक्षा रक्षक केवळ उद्यान उघड्या बंद करण्यापूरता येतो. उद्यानाच्या बाजूला रस्त्यालगत बसेस, ट्रक उभ्या केल्या जाजात. या वाहनांचा आडोसा घेऊन मद्यपान करणाऱ्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे निवासी भागातील नागरीक त्रस्त झाले आहेत. दारु पार्ट्या करणाऱ्यांचा पोलिस आणि केडीएमसीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.