कल्याण-सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील 400 सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली नाही तर यापूढे बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी दिली आहे. दरम्यान काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर काँग्रेस संघटनेचे कोषाध्यक्ष सूरज चिंडालिया यांनी सांगितले की, राज्यभरात सफाई कामगारांची संख्या 4 लाख इतकी आहे. राज्यभरातील महापालिका आणि पालिकांमध्ये 1 लाख सफाई कामगारांची पदे रिक्त आहे. ही पदे भरण्याऐवजी सरकारकडून खाजगी कंत्रटदाराला सफाईचे काम दिले जाते. कंत्रटी कामगारांची भरती केली जाते. राज्यभरात वारसा हक्कांची प्रकरणो विविध महापालिकांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी शर्ती लागू केल्या आहेत. त्यामुळे वारसा हक्कांची प्रकरणो प्रलंबित आहे. कोरोना काळात सफाई कामगारांना एक हजार रुपये भत्ता देण्याचे राज्य सरकारने जाहिर केले होते. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर महापालिका करीत नाहीत. सफाई कामगारांच्या महामंडळाची घोषणा सरकारने केली होती. त्याची स्थापना अद्याप सुरु झालेली नाही. सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न निकाली काढलेला नाही या विविध मागण्यासाठी आज काम बंद आंदोलन केले गेले. या आंदोलनास केवळ केडीएमसीत नाही तर राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, ज्या कामगार संघटनेने हे आंदोलन केले ती संघटना मान्यताप्राप्त नाही. संघटनेच्या वतीने आंदोलनाची पूर्व सूचना दिली गेली नव्हती. या आंदोलनात महापालिकेतील एकूण 2200 सफाई कामगारांपैकी 400 कामगार सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांची एका दिवसाची वेतन कपात केली जाईल. त्यांच्या विरोधात आयुक्तांना ठोस अहवाल दिला जाणार आहे. त्याचबरोबर कामात कसूर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे.