कल्याण - कल्याण शीळनजीक देसाई खाडीत मासेमारी करणाऱ्या धनाजी भोईर यांच्या जाळ्य़ात अॅलीगेटर जातीचा मासा अडकला. हा मासा जाळ्य़ातून बाहेर काढल्यावर काही वेळ जिवंत होता. त्यानंतर तो मृत पावला. देसाई खाडीत अॅलीगेटर आढळून आल्याने या खाडीत विविध प्रकारची जैव विविधता असल्याचा पुन्हा एकदा पुरावा मिळाला आहे. धनाजी भोईर हे देसाई खाडीत मासेमारी करतात. त्यांना हा मासा त्यांच्या जाळ्य़ात मिळून आला.
सह्याद्रीच्या फूट हिल्स ओळखल्या जाणाऱ्या मलंग गडाच्याच्या डोंगरपट्टीतून वाहत येणारी मोथली नदी ही पुढे देसाई खाडी म्हणून ओळखली जाते. देसाई खाडीत गोडय़ा व खाऱ्या पाण्याचा संगम आढळून येतो. अॅलीगेटर हा स्वच्छ पाण्यात आढळून येतो. देसाई खाडीत हा मासा कुठून व कसा आला याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तळोजा एमआयडीसीपासून मोथली नदी वाहते. मोथली नदी देसाईला खाडीला येऊन मिळेपर्यंत प्रचंड प्रदूषित झालेली आहे. उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात हरीत लवाद व सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू आहे. मात्र मोथलीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी अशा प्रकारचा कोणताही लढा सुरू नाही.
अलीगेटर मासा नदीत मिळून आल्याने नदी व खाडी परिसरात चांगल्या प्रकारची व विविध जातीची मत्य संपदा असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अॅलीगेटर हा मासा उत्तर अमेरिकेतील गोडय़ा पाण्यात मिळून येतो. 2018 सालच्या पूरानंतर हा केरळमध्ये मिळून आला होता. त्यानंतर तो गेल्या काही वर्षापासून कोलकत्ता, भुवनेश्वर याठिकाणी आढळून येत आहे. हा मासा पाण्यात प्रचंड मारका मासा म्हणून ओळखला जातो. सुसरसारखे याचे तोंड असते. लांब लंचक असलेल्या वाम माशासारख्या अॅलीगेटर दिसतो. जवळपास दहा फूट लांब असतो. त्याचे वजन खूप असते. भारतात त्याला प्रति किलोमागे 500 रुपये भाव मिळतो.