डोंबिवली - एक फेब्रुवारीपासून मध्य रेल्वेने मुंबईच्या लोकलने सामान्य नागरिकांना प्रवासासाठी ठरवून दिलेल्या वेळा खासगी क्षेत्रातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांना व अन्य लोकल प्रवाशांनाही फारशा सोयीच्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी नागरिकांना पूर्णवेळ लोकल प्रवासाची सुविधा देण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.शनिवार व रविवारी बहुतांश निमसरकारी आणि खासगी कार्यालये बंद असतात. हे दोन दिवस म्हणजे, शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत लोकल सामान्यांनाउपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. व्यवस्थित नियोजन केल्यास सकाळी सीएसएमटीवरुन डाऊन दिशेला आणि सायंकाळी अप दिशेला सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देता येईल, असेही महासंघाने सूचवले आहे. लोकल सेवा पूर्ण खुली करण्यापूर्वी मुंबई महानगर क्षेत्रातील कार्यालयीन वेळा कोणत्याही परिस्थितीत बदलण्याची आग्रही विनंती महासंघाने केली आहे.
सेवांपासून वंचित यासंदर्भात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले, लोकल पूर्णवेळ उपलब्ध नसल्याने कसारा, कर्जत, खोपोली व पनवेल परिसरातील नागरिक मागील दहा महिन्यांहून अधिक काळ लोकलने मुंबईला जाऊ शकले नाहीत. रुग्णालयीन उपचार, महत्त्वाची कामे, नातेवाइकांच्या भेटी, खरेदी, पर्यटन या बाबींचा विचार केल्यास मुंबईपासून दूर असलेले लाखो नागरिक आजही वंचित आहेत. सध्या दिलेला प्रवास वेळ अपुरा असल्याने दूरवर वास्तव्य करणारे नागरिक पूर्णवेळ लोकल प्रवासाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, कोरोनाचे निर्मूलन झाल्यशिवाय पूर्णवेळ लोकल प्रवासाची मुभा अशक्य असल्याची जाणीव महासंघाला असल्याचे ते म्हणाले.