पंकज पाटील, अंबरनाथ: नगरपालिकेचा कचरा चिखलोली येथील डम्पिंग ग्राउंडवर न टाकण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत. या आदेशामुळे आता अंबरनाथ पालिकेला त्यांचा कचरा बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही.
राष्ट्रीय हरित लवादाने अंबरनाथच्या चिखलोली येथील डम्पिंग ग्राउंडबाबत पालिकेच्या विरोधात निर्णय दिला आहे. हा डंपिंग ग्राउंड पालिकेने रहिवासी संकुलाच्या शेजारी सुरू केल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याप्रकरणी हरित लवादकडे दाद मागितली होती. हरित लवादाने चिखलोली येथील डम्पिंग ग्राउंड तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच पर्यायी व्यवस्था म्हणून संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ज्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे त्या ठिकाणी कचरा टाकावा असे आदेश देखील दिले आहेत. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर महापालिकेचा एकत्रित घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर उभारला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जोपर्यंत उभारला जात नाही तोपर्यंत अंबरनाथ पालिकेचा कचरा देखील त्याच प्रकल्पावर टाकण्याच्या पर्याय सुचवण्यात आला आहे.
चिखलोली येथील सर्वे क्रमांक 132 वरील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश आल्यामुळे आता पालिका प्रशासनाने देखील हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे आपला कचरा बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. हरित लवादाने या प्रकरणी निर्णय दिला असता तरी अद्याप बदलापूर शहरवासीयांनी याबाबत आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, तर दुसरीकडे बदलापुरातील राजकारणी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चौकट: # बदलापूर पालिकेचे डम्पिंग ग्राउंड सर्वे क्रमांक 188 या ठिकाणी असून पूर्वी त्या ठिकाणी दगडखान होती. याच दगड खाणीजवळ पालिकेने डम्पिंग ग्राउंड सुरू केले असून त्याच्या उर्वरित जागेमध्ये संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवला जाणार आहे. # अंबरनाथ शहरातील सरासरी 90 ते 100 टन कचरा हा दिवसाला बाहेर पडत असून तो आता बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर टाकण्याची वेळ येणार आहे. तर दुसरीकडे बदलापूर शहराचा 70 ते 80 टन कचरा देखील याच डम्पिंग ग्राउंड वर पडत आहे.