अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद मर्यादित असल्याने आपल्या पक्षाचे माजी खासदार आनंद परांजपे यांना भाजपने कमळ चिन्हावर ठाणे मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिला होता. मात्र, परांजपे यांचा बायोडेटा भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावला.
भाजपचे माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांना रिंगणात उतरवण्याचे भाजपने जवळपास निश्चित केल्याचे मानले जाते. ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या तीन जागा आहेत. त्यापैकी कल्याणची जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. भिवंडीची जागा भाजपकडे आहे. ठाण्याच्या जागेवरून शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकेकाळी ही जागा भाजपकडे होती. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित असल्याने अजित पवार गटाने वेगळा डाव टाकला. आपल्या पक्षातील आनंद परांजपे यांना भाजपने कमळ चिन्हावर उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, दिल्लीतील श्रेष्ठींनी तो फेटाळला.
दोनदा झाले आहेत पराभूत
परांजपे हे पोटनिवडणुकीनंतर २००८ मध्ये आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत असे दोनदा शिवसेनेचे खासदार होते. २०१२ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर २०१४ मध्ये ते विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघात उभे होते. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर एकदा ठाण्यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, होती, त्यातही त्यांचा पराभव झाला होता.
मी दोन वेळा खासदार राहिलो आहे, एकदा ठाण्याचा आणि एकदा कल्याणचा. त्यामुळे चर्चा तर होणारच. महायुती जो उमेदवार देईल, त्यासाठी आम्ही काम करणार. - आनंद परांजपे, माजी खासदार