- मुरलीधऱ भवारकल्याण - रेल्वे प्रवासात एक कुटुंब त्यांची बॅग विसरले. बॅगेत ४४ ताेळे साेने आणि दीड किलाे चांदीचे दागिने हाेते. श्रीराम सूर्यंप्रसाद एळूरिपटी नावाचा व्यक्ती त्याच्या मुलीचे दागिने हैद्राबाद येथून घेऊन मेल एक्सप्रेसने अंबरनाथला येत हाेते. ते गाडीतून उतरले मात्र त्यांच्या दागिन्याची बॅग गाडीतच राहिली. रेल्वे प्रवासात मुलीचे हरविलेले २३ लाखाचे दागिने परत मिळाल्याने कुटुंबियांच्या आनंद फुलला.
हैदराबाद मुंबई डेक्कन एक्सप्रेसने कल्याणपर्यंत प्रवास करत असताना श्रीराम एळूरिपटी या प्रवाशांची बॅग गाडीत राहिली. त्यांनी या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे गुन्हे शाखा, एसटीएफच्या पथकाने या बॅगेचा शोध सुरू केला. कल्याण, दादर, सीएसटी रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले. याच दरम्यान दादर रेल्वे स्टेशनवर एक इसम तक्रारदाराने दिलेल्या वर्णनाची बॅग घेवून जाताना आढळून आला. एसटीएफ पथकाने या इसमाचा शोध सुरू केला .या इसम गुजरात अहमदाबाद येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुजरात अहमदाबादमधील त्याचा ठाव ठिकाणा शोधला. या इसमाला पथकाने गाठले त्याच्याकडून दागिने असलेली बॅग ताब्यात घेतली. कल्याण लोहमार्ग पोलीस, रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाच्या पथकाने अथक तपास करत ही बॅग शोधून काढली. त्यांच्या कामगिरीचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.