कल्याण : अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून त्यांनी अनुभवलेला संघर्ष मांडला. त्यांचे कार्य केवळ मातंग समाजाकरता नव्हते. तर ,महिला व दिनदुबळ्यांकरता त्यांनी आपल्या लेखणीचा प्रभावी उपयोग केलेला दिसतो. अण्णाभाऊ साठे हे अजूनही समाजाला नीट कळलेले नाहीत. त्यांचे साहित्य वारंवार वाचले तरच आपल्याला त्यांचे विचार समजण्यास सुरुवात होईल. शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये असलेले विविध गुणही आपल्याला जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन मातंग चेतना परिषदेचे प्रांत प्रमुख किशोर अल्लाड यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त नूतन हायस्कूल कल्याण येथे सोबती सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असताना त्यांच्या भाषणात वरील प्रतिपादन केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मातंग समाजाला लढवैय्या असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावर कृष्णा फाळके आवळे सव एकनाथ भिसे हे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सोनावळे व विद्यमान अध्यक्ष विलास लोखंडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
समाजातील महापुरुष लहुजी वस्ताद व मातंग ऋषी यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण कल्याणकरांना सामील करून करण्यात यावे असे जाहीर आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास जनकल्याण समितीचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ललित सारंग, कल्याण शहर प्रमुख अरुण देशपांडे, गुलाब जगताप व रोशन सूर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव नितीन वायदंडे व मोहन साठे यांनी केले.