मुरलीधर भवार, कल्याण-कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील इराणी वस्तीत पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना मध्यरात्रीस घडली आहे. एका इराणी चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक इराणी वस्तीत गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत दहा पोलिस जखमी झाले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्हयात तीन आराेपी पोलिसांना हवे होते. ते आंबिवली इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. अंधेरी पोलिस ठाण्याचे पोलिसांनी खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला. अंधेरी पोलिस आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्तरित्या आंबिवलीची इराणी वस्ती गाठली. काल रात्री दोन वाजता पोलिस पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपींच्या नातेवाईक आणि इराणी वस्तीतील पुरुष महिलांनी पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला केला. रात्रीच्या अंधारात पोलिसांवर हल्ला झाल्याने वर्सीत पांगापांग झाली. या हल्ल्यात दहा पोलिस जखमी झाले आहेत.
इराणी वस्तीतून अनेक गुन्हयातील आरोपी पोलिसांनी यापूर्वी पकडले आहे. पोलिस याठिकाणी चोरट्यांना पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार घडलेले आहेत. २००८ साली गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्याला पकडण्यासाठी इराणी वस्तीत गेले असता. पथकावर हल्ला केला होता. त्यावेळी पाेलिसांना गोळीबार करावा लागला हाेता. आत्तापर्यंत ५० वेळा तरी पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रकार घडलेले आहेत.