कल्याण - कल्याण डोंबिवली शहरात गेली वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला कल्याण शीळ हा रस्ता कायमच वादग्रस्त चर्चेत राहिला आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी आज मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. यावेळी एमआयडीसीचे अधिकारीदेखील उपस्थित होते. एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कोणत्या सालातील आहेत? नुसत्या मंजुऱ्या येतात, होर्डिंग्ज लागतात...पण रस्त्यांची कामे काही होत नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सेनेला टोला लगावला. इतकेच नाही तर आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवत असल्याचा गौप्यस्फोटही पाटील यांनी यावेळी केला.
कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. याअगोदर एमआयडीसी परीसरातील रस्ते व इतर रस्त्यांसाठीही निधी मंजूर झाल्याचे सेनेकडून सांगण्यात आले होते. हाच धागा पकडत पाटील यांनी नाव न घेता खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाना साधला आहे. नुसते होर्डिंग लावून मंजुऱ्या मिळाल्याचे सांगितले जाते प्रत्यक्षात काम होत नाही असे सांगत आम्ही जे रस्ते मंजूर केले तेही आपल्या नावावर खपवले जात असल्याचे पाटील म्हणाले. कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. पलावा ते सुयोग हॉटेल चौकापर्यंतच्या मार्गावर 3 महत्वाचे जंक्शन्स आहेत. कुशाला हॉटेल, मानपाडा चौक आणि सुयोग हॉटेल या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना आपण यावेळी एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना केल्याचे पाटील यांनी सांगितले.रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी असतील त्या लवकरच दूर केल्या जातील असे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांपैकी कल्याण शीळ रस्ता असून गेल्या अनेक दिवसांपासून येथील काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी नवीन रस्त्याला सुद्धा तडे गेलेत. त्यातच निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.