कल्याण-वास्तूविशारद संदीप पाटील यांच्या जिविताला धोका आहे. सहा दिवसापूर्वी त्यांच्या घराजवळ दोन संशयित व्यक्ती आले. त्यांनी त्यांचे नाव विचारून त्यांच्या गाडीचा नंबर नोंद करुन घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या जिविताला धोका असल्याचे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार पाटील यांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, त्यांनी २००८ साली कल्याण शीळ रस्ते विकास कामाच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा पाठपुरावा करुन जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत टोल वसूली करु नये असे म्हटले होते. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकाम करणाऱ््या बिल्डरांनी महापालिकेचा सही शिक्का तयार करुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवली असे भासवून त्या बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले.
या प्रकरणी ६५ बिल्डरांच्या विरोधात ईडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. एका आरक्षित बगीच्या विषयी तक्रार केली आहे. तसेच बीएसयूपी योजनेतील अपात्र ९० लाभार्थींना घरे देऊ नयेत या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. ती न्याय प्रविष्ट आहे. तसेच डोेबिवलीतील आरक्षीत भूखंडावरील बेकायदा इमारत प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. या विविध प्रकरणामुळे पाटील यांच्या जिविताला धोका असल्याचे म्हटले आहे. पाटील यांनी त्यांना पोलिस संरक्षण दिले जावे अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. त्याचबरोबर अग्नीशस्त्र बाळगण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. पाेलिस संरक्षण आणि ्अग्नीशस्त्र वापरण्याचा परवानगी पाटील यांना देण्यात आलेली नाही.
२८ नोव्हेंबर रोजी पाटील राहत असलेल्या गोळवली येथील घराच्या बाहेर दोन जण एका चार चाकीतून आले. त्यांनी पाटील यांच्या गाडीचा नंबर विचारला. तसेच पाटील यांच्या नावाची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकाने त्या चौघांना हाटकले असते ते निघून गेले. त्यांचा शोध घ्यावा असे पाटील यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.