कल्याण-देशभरात चैन स्न’चिंग, जबरी चोरी, वाहन चोरी करुन धुमाकूळ घालणाऱ्या इराणी चोरट्याला कल्याणनजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अपेदारा आफ्रीदी असे या चोरट्याचे नाव आहे. खडकपाडा पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अटकेसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर दगडफेक केली होती. देशभरात आफ्रीदीच्या विरोधात ३० गुन्हे दाखल आहे. आफ्रीदा हा १० गुन्हयात फरार होता अशी माहीती समोर आली आहे.
ठाणे जिल्हासह राज्यात आणि देशभरात चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या आफ्रिदी याचा शोध पोलीस घेत होते. मात्र अनेक वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे पथक कल्याण जवळ आंबिवली येथील इराणी वस्तीत एका इराणी चोरट्याला अटक करून घेऊन जात असताना आफ्रिदि याने पोलिसांना विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली होती. पोलीस आफ्रिदीचा शोध घेत होते.
आफ्रिदी कल्याण जवळील आंबिवलीच्या इराणी वस्तीतील मंगलनगर येथे राहत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने मंगल नगर परिसरात सापळा रचला. आफ्रिदी येताना दिसताच त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. आफ्रिदी विरोधात देशभरात ३० गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस पुढील तपास करीत आहेत.