प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने फेक फेसबूक अकाऊंट तयार करत त्यावरून अनेक महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविल्याचा धक्कादायक प्रकार मे महिन्यात समोर आला होता. दरम्यान फेक आकाऊंट तयार करणा-या चंदन शिर्सेकर या २८ वर्षीय तरूणाला कोळसेवाडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
काही दिवसापूर्वीच गायकवाड यांची खिल्ली उडवून बदनामी करणारा व्हीडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्यांचा ओरीजनल व्हिडीओ एडिट करून त्यात कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल आहे. दरम्यान मे महिन्यात आमदारांच्या नावाने फेसबूकवर फेक अकाऊंट तयार करून त्याद्वारे महिलांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. त्यामध्ये हाय हॅलो, गुड माॅर्निंग, तुम्ही भेटू शकता का असे मेसेजही पाठविले गेले होते. काही महिलांनी थेट आमदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधत साहेब तूम्ही फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली आहे का अशी विचारणा केली त्यावेळी फेक अकाऊंटचा प्रकार उघडकीस आला. गायकवाड यांनी याबाबतची तक्रार थेट पाेलिस आयुक्तांकडे केली होती. अटक करण्यात आलेला शिर्सेकर कोळसेवाडी परिसरात राहणारा असून तो ओला गाडी चालक असल्याची माहीती मिळत आहे.
सूत्रधाराला अटक करा
आपण पकडले जाऊ नये म्हणून चंदन दुस-यांचे वायफाय आणि हॉटस्पाॅट वापरायचा. त्याने हा प्रकार का केला? कोणाच्या सांगण्यावरुन केला आहे का? असे मेसेज पाठवून काही आर्थिक फायदा केला आहे का? या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. आरोपीने कोणाच्या सांगण्यावरुन हा प्रकार केला आहे. यामागे माझी बदनामी करण्याचा उद्देश आहे. पोलिसांनी लवकरात लवकर सखोल चौकशी करुन सूत्रधाराला देखील अटक करावी अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.