कल्याण : इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख होऊन झालेल्या प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या कुणाल रातांबे (२३, रा. रायगड) याला ठाणे युनिट क्रमांक २, गुन्हे शाखा लोहमार्ग (मुंबई) च्या पथकाने ४८ तासात पकडले.
सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान आपल्या कुटुंबासह अल्पवयीन मुलगी प्रवास करत होती. याच दरम्यान अचानक ती गायब झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तपास पथकांनी ठाणे व कल्याण रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी, अल्पवयीन मुलगी ही कल्याण रेल्वे स्थानक येथी एकटीच गाडीतून फलाटावर उतरून जाताना दिसून आली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान, ही मुलगी रायगड जिल्ह्यातील वेनगावात राहणाऱ्या कुणालच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मुलीची सुटका करत कुणालला ताब्यात घेतले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांची ओळख होऊन प्रेमसंबंध झाल्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली कुणालने पोलीस पथकाला दिली. कुणालला पुढील कारवाईसाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.