कल्याण :
रा.स्व.संघाच्या नमस्कार मंडळात लागणाऱ्या प्रताप सायं शाखेचे मुख्य शिक्षक कै. बंडू गोगटे यांच्यामुळे मी कथाकथन, वक्तृत्व करायला शिकलो. तसेच चित्रकलेबद्दल सांगायचे तर जे जे मधून जी.डी.आर्ट मध्ये शिक्षण घेऊन ६० वर्षे झाली आहेत. रोज एक तरी चित्र काढल्यावाचून मी राहिलो नाही म्हणून कलेनेही मला यश, सन्मान, व आत्मिक समाधान दिले. तपश्चर्या ही फळ देतेच, असे प्रख्यात चित्रकार, मुख्याध्यापक, कथाकथनकार, वनवासी कल्याण आश्रम कल्याणचे माजी अध्यक्ष श्रीधर केळकर म्हणाले.
कल्याणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा २०२२ चा शताब्दी पुरस्कार प्रदान समारंभ सोमवारी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात केळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते.
कुटुंबियांसह नातेवाईक, मित्र आणि वनवासी आश्रमाचे कार्यकर्ते आदींनी मला सांभाळून घेतले त्यामुळेच सर्व साध्य झाले" असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीर साठी काम करणाऱ्या हम या संस्थेचे कार्यकर्ते, डोंबिवली नागरी सहकारी संस्थेचे संचालक, जयंत पित्रे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख २५हजार रुपये असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते. मिळालेल्या पुरस्कारात स्वतःची तेवढीच भर टाकून ५१ हजार रुपयांचा निधी केळकर यांनी वनवासी कल्याण आश्रमाला देणगी म्हणून आश्रमाच्या कल्याण शाखेचे विद्यमान अध्यक्ष प्रफुल्ल गवळी, पदाधिकारी लक्ष्मण अग्रवाल यांच्यांकडे देण्यात आला. तसेच यानिमित्ताने आणखी २५००० रुपयांचा निधी केळकर यांनी शताब्दी पुरस्कार न्यासासाठी गोपाळराव भिडे यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वा.द. साठे यांनी केले तर मानपत्राचे वाचन डॉ. रत्नाकर फाटक यांनी केले. कार्यक्रमाला कल्याणातील विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.