उल्हासनगर : शहरातील रस्त्यातील खड्डे भरण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, महापालिका बांधकाम विभागाला जाग येवून भरपावसात शनिवारी रस्त्यातील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली. तर प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरूच असल्याची माहिती दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ६ कोटीच्या निधीतून पूर्व व पश्चिम अश्या निविदा काढली. मात्र निविदा प्रक्रियेला निवडणूक आचारसंहितामुळे विलंब झाल्याने, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम रखडले. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खड्डयात गेल्याची टीका होत आहे. वाहतूक पोलीस वॉर्डन व काही रिक्षाचालक रस्त्यातील खड्डे भरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, महापालिका कारभारावर सर्वस्तरातून टीका होत आहे. कॅम्प नं-३ शांतीनगर स्मशानभूमी रस्त्यातील खड्डे महापालिकेच्या वतीने भरपावसात भरण्यात आले. पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असून पावसाळ्याने विश्रांती घेतल्यावर रस्त्यातील खड्डे विशिष्ट पद्धतीने भरण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी दिली.
महापालिकेने एकीकडे शहरातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले असतांना, दुसरीकडे नाल्यातील काढलेला गाळ व कचरा ठेकेदाराने ९० टक्के पेक्षा जास्त उचलला आहे. ज्या ठिकाणी नाल्यातील गाळ पडून आहे. तो गाळही युद्धपातळीवर उचलला जाणार असल्याचा दावा महापालिकेने केला. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी पावसाळ्यापूर्वी व नंतर नाले सफाईची पाहणी केल्याने, नाले चकाचक झाल्याचे बोलले जात आहे.