डोंबिवली: एमआयडीसी मिलापनगर मधील ग्रिन्स इंग्लिश स्कूल जवळ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. काँक्रीटीकरण मुळे रस्ता उंच झाल्याने पूर्वी नाल्यावर असलेला जुना छोटा कठडा आता काँक्रीटीकरणात झाकला गेल्याने आता नाहीसा झाला आहे. रस्ते बनविणाऱ्या एमएमआरडीएच्या ठेकेदाराने मात्र आवश्यक असणारा हा नाल्यावरचा कठडा बनविला नाही. गेल्या काही दिवसांपासून या कठडा नसलेल्या रस्त्यावरून काही शाळकरी आणि रोज सरावासाठी फिरणारी सायकलस्वार मुले ही या रस्त्यावरून नाल्यात पडत असल्याचे दिसत आहे. सदर रस्त्यावरून समोरून एखादे मोठे वाहन ( बस/ट्रक) आल्यास रस्ता रुंदी कमी असल्याने हे सायकलस्वार तोल जाऊन पाच-सहा फूट खोल नाल्यात पडत आहेत.
सद्या या नाल्यात पाणी नसल्याने ही अल्पवयीन सायकलस्वार मुले त्यात पडून जखमी होत आहेत. येथून ग्रिन्स इंग्लिश स्कूल आणि सेंट जोसेफ स्कूल या शाळा जवळ असल्याने तसेच सायकल सराव करण्यासाठी फिरणारी मुले येथून जा ये करीत असल्याने ते या नाल्यात पडत आहेत. अशा प्रकारचे नाल्यावर कठडा नसलेले रस्ते बऱ्याच ठिकाणी निवासी भागात असल्याने एखादे वाहन पण त्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. ती बाब ही रस्ते बनविणाऱ्या ठेकेदाराला आणि गटारे/नाले यांची कामे करणारे एमआयडीसी/केडीएमसी प्रशासनाला सांगण्यात आले असून आता हे कठडा बांधण्याचे काम कोण करणार हे पाहावे लागेल अशी मागणी दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केली.